धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपनीच्या मनमानी आणि मुजोर कारभाराच्या विरोधात भूम आणि वाशी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. रिन्यू विंड पावर, सिरेंटीका व 02 यासह अन्य कंपनी विरोधात सुरु असलेल्या या आमरण उपोषणाचा आज 5 वा दिवस असुन 3 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली आहे . शेतकऱ्यांनी आक्रमक होत रस्ता रोको केला त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. काही महिला नियोजन विभागाच्या इमारतीवर चढल्या त्यांनी उडी मरून आत्महत्याचा इशारा दिला. आंदोलन चिघळले असुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांसह सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.
मावेजावरून पवनचक्की कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात मागील 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु असुन यावर तोडगा न निघाल्याने शेतकरी आक्रमक झाले. समसमान मोबदल्याची शेतकरी यांची मागणी आहे. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारणीचं काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमतीविना किंवा कोऱ्या करारनाम्यांवर सह्या घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. काही करारनाम्यांमध्ये मजकूर नसताना शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या गेल्या असून, काही ठिकाणी मिळालेला मोबदला हजारांत, तर काही ठिकाणी लाखांत आहे, ही मोठी तफावत अन्यायकारक आहे.
शेतकऱ्यांची संमती नसतानाही पोलिस बळ, दलाल आणि गुंडांच्या मदतीने टॉवर उभारले जात आहेत, शेतकरी यांच्यावर अन्याय केला जात आहे. टॉवरच्या विद्युत वाहिन्या ज्या जमिनीवरून जात आहेत, त्या जमिनी शेतकऱ्यांना भविष्यात वापरता येणार नाहीत त्यामुळे त्यांना योग्य समान मोबदला देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांसोबत केलेले करारनामे इंग्रजी भाषेत आहेत आणि ते अद्याप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत असे अनेक मुद्दे आहेत.