अवैध सावकारांना दणका – 38 हेक्टर जमीन शेकऱ्यांना परत
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हास्तरीय अवैध सावकारी नियंत्रण समितीच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात 38.12 हेक्टर शेत जमीन संबधित शेतकऱ्यांना परत करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सदस्य सचिव) तसेच सर्व संबंधित उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 मधील कलम 16, कलम 18 व कलम 9 याबाबत होत असलेल्या कार्यवाहीबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर वैध सावकारीकरिता सावकारी परवाने देण्याबाबत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती आणि अवैध सावकारी प्रकरणांच्या अनुषंगाने सहकार विभागाकडून जिल्हास्तरावर होत असलेली कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हयातील अवैध सावकारीबाबतचे एकूण 50 प्रकरणामध्ये आतापर्यंत 63 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 31 प्रकरणांमध्ये 38.12 हेक्टर जमीन संबधित शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. सध्या जिल्हा उपनिबंधक यांचे स्तरावर 135 प्रकरणांमध्ये सुनावणीची कार्यवाही चालू आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अवैध सावकारी प्रकरणाच्या अनुषंगाने अंतिम टप्यात असलेल्या प्रकरणांच्या बाबतीत विनाविलंब अंतिम सुनावणी घेऊन निर्णय देण्यात यावा, अवैध सावकारी बाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांची आकाशवाणीवर मुलाखत आयोजित करून त्याचे प्राधान्याने प्रसारण होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
जिल्हयातील मल्टीस्टेट पतसंस्थेमार्फत कर्जाचे बोजे नोंदवून अवैध सावकारी होणार नाही, याची दक्षता म्हणून अवैध सावकारी निष्पन्न झालेल्या प्रकरणातील व्यक्तींची यादी केंद्रीय निबंधक यांना देवून अशा व्यक्तींना मल्टीस्टेट पतसंस्थेचे सभासद होण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत विनंती करण्यात यावी.तसेच जिल्हयातील अवैध सावकारी बाबतच्या प्रकरणाची यादी दुय्यम निबंधक कार्यालयास देवून तक्रार अर्जातील नमुद खरेदी खताची पुन्हा खरेदी-विक्री होणार नाही.याची दक्षता सर्व दुय्यम निबंधक यांनी घ्यावी असे निर्देश दिले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या परिसरात अवैध सावकारी होत असल्याचे निदर्शनास आल्यास,मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून अवैध सावकारी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत सहकार विभागाशी तात्काळ संपर्क साधावा.जेणेकरुन जिल्हयात अवैध सावकारीला आळा घालणे शक्य होईल,असे सावकाराचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी कळविले आहे