राष्ट्रीय महामार्गवरील धाबे हॉटेल बनले विक्रीचे अड्डे – सर्वत्र कारवाई होणार का ?
एकट्या जळकोट येथे 5 ठिकाणी विक्री, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 5 जणांवर गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैधरित्या बायोडीझलच्या नावाखाली भेसळयुक्त केमिकल, डीझेलची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या पाच ठिकाणी महसुल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकीत 7 लाख 70 हजार रुपयांचे बायोडिझेल व 5 लाख 40 हजार रुपयांचे साहित्य असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 5 आरोपी विरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध बायोडिझेलची मोठ्या प्रमाणात अनेक धाब्यावर राष्ट्रीय महामार्गलगत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुलेआम विक्री होत असुन याचे धागेदोरे लांब गुजरातपर्यंत असल्याची सूत्रांची माहिती आहे. याठिकाणी बायोडिझेलची मोठ्या प्रमाणात विक्री होत असुन बाजारात मिळणाऱ्या डिझेल दराच्या तुलनेत हे दर प्रति लीटर 20 ते 25 रुपये इतके कमी असल्याने लांब पल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू गाड्याची या ठिकाणी बायोडिझेल भरण्यासाठी कायम वेटींग (वाहनांच्या रांगा) असतात. महसूल व पोलीस प्रशासनाने केवळ एकट्या जळकोट भागात 5 ठिकाणे उघडकीस आणली असुन यावरून जिल्ह्यात किती ठिकाणी हा धंदा सुरू आहे याची कल्पना येते. इतर ठिकाणी प्रशासन कारवाई कधी करणार ? व या धंद्याला पाठबळ कोण देते यासह याची चैन उलघडणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, सपोनि जगदीश राऊत यांच्यासह एका संयुक्त पथकाने सोलापूर – हैद्राबाद महामार्गावर जयशंकर ढाबा, आलियाबाद शिवारातील रामदेव हॉटेल, जळकोट शिवारातील गणेश ढाबा , हॉटेल गारवा व हॉटेल महाराजा आदी पाच ठिकाणी धाड टाकून लाखो रुपयाचे केमिकल युक्त अवैध डीझेल जप्त केले आहे. यातील जयशंकर धाबा येथे तर प्लास्टिकच्या टाक्या जोडून चक्क पेट्रोल पंप सारखे सेट अप तयार करून विक्री सुरू होती याठिकाणी 8 हजार 500 लिटर द्रव्य पकडले असून दिनकर सुरवसे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे तर सचिन हासुरे, सत्यनारायण कदम,खासीम जमादार व शेषराव काळे या 5 जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून धुळे बेंगलोर व मुंबई हैद्राबाद हे राष्ट्रीय महामार्ग जात असून या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या ६ महिन्यांपासून केमिकल युक्त बायोडिझेल च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि धाब्यांवर विना परवानगी केमिकल युक्त डिझेलची सर्रास विक्री चालू आहे. या विक्रीला जिल्हा प्रशासन कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालय यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यात एकही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही व कोणत्याही कार्यालयात याची नोंद नाही. तसेच राष्ट्रीय महामार्ग व ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्याबाबतचा कुठलाही परवाना न घेता मोठ्या प्रमाणात याची विक्री चालू आहे. यामुळे राज्य शासनाचा महसूल बुडत आहे.
तुळजापूर येथील नायब तहसीलदार अमित भारती, संदीप जाधव,संतोष पाटील, नळदुर्गचे मंडळ अधिकारी अमर गांधले, नेमचंद शिंदे,पवन भोकरे,तलाठी अशोक भातभागे,परमेश्वर शेवाळे, आबासाहेब सुरवसे,गणेश जगताप,दयानंद काळे,तुकाराम कदम तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक जोशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे,बांगर,गायकवाड, सुरवसे,सगर, पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.