अपहार प्रकरणी गुन्हा दाखल – तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह 3 जणांचा सहभाग, 21 लाखांचा घोटाळा
धाराशिव – समय सारथी
शासकीय निधीचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यालगट्टे यांच्यासह 3 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाजपचे विधानपरिषदेतील आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेच्या निधीत अपहार केल्याची व यलगट्टे यांच्या काळात झालेल्या विविध योजना याचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली होती त्यावरून जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा दैनिक समय सारथी वृत्तपत्राने याचा वारंवार पाठपुरावा केला होता.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची चौकशी समिती नेमली होती त्यात उमरगा नगर परिषदेचे लेखापाल अंकुश माने, भुम नगर परिषदेचे विवेकानंद बिराजदार, कळंब नगर परिषदेचे लेखापाल हिंदुराव जगताप, लोहाराचे दीपक मुंडे, वाशीचे लेखापाल भागवत पवार यांचा समावेश होता. त्यांनी अनेक मुद्याची चौकशी करुन अहवाल सादर केला त्यात अनेक संचिका, खर्चाचे व्हाऊचर गायब असणे, निधीचा अपहार व गैरवापर करणे याचा समावेश होता.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. तो निधी त्या योजनेत जमा न करता रमाई आवास योजनेच्या खात्यात जमा केला त्यात 2 कोटी 93 लाख रुपये जमा केले व उर्वरित 21 लाख 64 हजार रकमेचा अपहार केला. तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण जनार्धन यलगट्टे, लेखापाल सुरज संपत बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत विक्रम पवार यांनी ही रक्कम अपहरीत केल्याचे चौकशी समितीत नमूद केले आहे त्यानुसार संगमत करुन रक्कम योजना बाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नगर परिषदेचे लेखापाल अशोक फरताडे यांना मुख्याधिकारी यांनी प्राधिकृत केले होते त्यानुसार दाखल केलेल्या फिर्यादीवरून आनंद नगर पोलिस ठाण्यात कलम 409, 420, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे करीत आहेत.
बोंदर समितीने दिलेल्या अहवालानुसार अनेक बाबीत अनियमितता अपहार आहे. त्यात काही विकास कामांच्या कोट्यावधी रुपयाच्या संचिका व इतर कागदपत्रे गहाळ असणे, बोगस नियमबाह्य गुंठेवारी याचा समावेश आहे यात स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे नोंद होऊ शकतात तर तुळजापुर व धाराशिव येथील अनुकंपा नौकर भरती, बायोमायनींग यासह प्रकरणे अंतीम टप्प्यात आहेत. विधिमंडळात खोटी चुकीची माहिती दिल्या प्रकरणी 2 वेगवेगळ्या विषयात हक्कभंगाची यलगट्टे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. धाराशिव नगर परिषदेतील काही आजी – माजी कर्मचारी काही ठेकेदार कारवाईच्या रडारवर आहेत.
नुकतेच आमदार धस यांच्या तक्रारीवरून यलगट्टे यांचे वर्ग गट अ संवर्गातून गट ब वर्गात डिमोशन म्हणजेच पदावनत करण्यात आले होते. त्या झटक्यानंतर आता हा गुन्हा नोंद होऊन दुसरा झटका बसला आहे. शासनाला प्रमोशन देताना खोटी माहिती देण्यात आली तसेच लाभ घेतल्याने या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना देण्यात आलेले वेतन, भत्ते याची वसुली नियमानुसार करावे तसेच यलगट्टे यांच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाद्वारे चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी पत्राद्वारे केली आहे.
धाराशिव नगर परिषदेतील भंगारचोरी, बोगस बांधकाम परवाना, अट्रॉसिटी, चेक बाउंस या प्रकरणात यलगट्टे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता त्यावेळी ते फरार होते त्यानंतर धाराशिव पोलिसांनी यलगट्टे यांना मोठ्या शिताफिने एसटी बस मधुन प्रवास करताना नाशिक जिल्ह्यात पकडले होते आता पोलिस त्यांच्या शोधावर आहेत.
नांदेड जिल्ह्यातील भोकर, माजलगाव, अश्या ठिकाणी जवळपास 6 ते 7 गुन्हे नोंद असुन त्यांना आजवर 2 वेळेस 3 दिवसापेक्षा अधिकची पोलिस कोठडी झाली आहे तर धाराशिव येथे गुन्ह्यात ते तब्बल 21 दिवस पोलिस कोठडी व जेलमध्ये होते त्यामुळे त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशीही मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
अनेक घोटाळ्यांनी सलग 2 अधिवेशन गाजलेल्या यलगट्टे यांचा उल्लेख प्रश्न उत्तराच्या चर्चेवेळी खुद्द विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात केला होता. यलगट्टे यांच्यासह अन्य मुख्याधिकारी यांना नियमबाह्य रित्या प्रमोशन दिले गेल्याचा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत उपस्थितीत केला होता. यलगट्टे यांच्यासह मुख्याधिकारी रवी पवार, त्रिंबक डेंगळे पाटील, अजय चारठाणकर,यशवंत डांगे, वसुधा फड यांसह अन्य मुख्याधिकारी यांचे प्रमोशन नियमबाह्य झाले असल्याचा धस यांचा सभागृहात आरोप आहे त्यामुळे आता उर्वरित लोकांवर काय कारवाई होते ते पहावे लागेल. गंभीर गुन्हे, विभागीय चौकशी सुरु असताना त्याची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्यात आली नाही, त्यात संगनमत केले, प्रमोशनवेळी माहिती दडवली गेली असे गंभीर प्रकार आहेत यात कार्यवाही सुरु आहे.