अटक – फरार आरोपी तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे अखेर अटक, धाराशिव पोलिसांची कारवाई
धाराशिव – समय सारथी
विविध गुन्ह्यातील फरार आरोपी असलेले धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना अखेर अटक करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत व एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यात जाऊन नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील लासलगाव येथे ही कामगिरी केली आहे.
यलगट्टे यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर, शहर पोलीस ठाण्याचे उस्मान शेख यांच्या पथकांचा यात समावेश होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अनेक तांत्रिक मुद्याचं विश्लेषण करीत फरार आरोपीचा ठिकाणा शोधन्यासाठी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, चव्हाण, तुपे, अशोक ढगारे, बलदेव ठाकूर, रवी अरसेवाड यांनी त्यांनी सापळा रचत ही अटक केली.
यलगट्टे हे बांधकाम परवान्यात शासनाची फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ या 2 गुन्ह्यात फरार आरोपी असुन त्यांच्यावर विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी हक्कभंग दाखल केला आहे. विशेष म्हणजे बोगस बांधकाम परवाना प्रकरणात मंगळवारी त्यांचा जामीन अर्ज धाराशिव कोर्टातील न्यायाधीश गुप्ता यांनी फेटाळला होता.
दैनिक समय सारथी वृत्तपत्राने यलगट्टे यांच्या नगर परिषद आवारातील भंगार चोरी, बँक खाती व चेक बाउन्स प्रकरण, बोगस कागदपत्रे आधारे बांधकाम परवाना या कारनाम्याचा भांडाफोड करीत पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश आले असुन यलगट्टे यांना अटक केली आहे.