अटक पुर्व जामीन अर्ज फेटाळला – फरार आरोपी लेखापाल बोर्डे यांच्या अडचणीत वाढ
ठेकेदार, विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गायब प्रकरणात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे व अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार या 3 जणांवर विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 27 कोटी 34 लाख रुपये रकमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके संगनमत करून जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवली नाहीत अशी तक्रार दिल्यानंतर आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर या महाघोटाळ्याची पोलखोल झाली आहे.
बोगस गुंठेवारी प्रकरणाची व्याप्ती, संख्या व इतर तांत्रिक बाबी लक्षात घेता नगर रचना विभागाचे सहायक संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती गठीत केली अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्यात या समितीचा अहवाल अंतीम होण्याची शक्यता आहे. खुल्या जागेवर,आरक्षित भुखंड, मूळ मालकाच्या जागेची, पर्याप्त कागदपत्रे नसताना गुंठेवारी यासारखे प्रकार घडले आहेत.
अनेक गुंठेवारीचे आदेश आहेत मात्र मूळ संचिका व कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. पैसे भरून न घेता आदेश देणे असे गंभीर प्रकार घडले आहेत. शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या जागा, ग्रीन झोनमधील जागा गुंठेवारी केल्या आहेत. हा प्रकार चांगलाच अंगलट येणार असुन अनेक जण अडकण्याची शक्यता आहे.