अटक पुर्व जामिनीसाठी फरार आरोपी सुरज बोर्डे यांचा अर्ज – 14 ऑगस्टला सुनावणी
तत्कालीन मुख्याधिकारी यालगट्टे यांच्या जामीनावर 11 ऑगस्टला सुनावणी तर बोर्डे व पवार फरार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील फसवणूक व अपहार प्रकरणातील फरार आरोपी लेखापाल सुरज बोर्डे याने अटक पुर्व जामिनीसाठी अर्ज केला असुन त्यावर 14 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. कोर्टाने पोलिस तपासी अधिकारी व सरकारी वकिलांचे म्हणणे मागितले आहे तर मुख्याधिकारी यलगट्टे यांच्या जामीनावर 11 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. बोर्डे व पवार हे फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यलगट्टे हे सध्या धाराशिव जिल्हा कारागृहात आहेत. बोर्डे यांच्या वतीने ऍड विशाल साखरे तर यलगट्टे यांच्या वतीने ऍड सुधाकर मुंडे कोर्टात बाजू मांडत आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी आलेला 3 कोटी 14 लाख रुपयांचा निधी रमाई आवास योजनेच्या खात्यात जमा करुन त्यातील 21 लाख 64 हजार रकमेचा अपहार व फसवणूक केल्या प्रकरणी यलगट्टे यांच्यासह लेखापाल सुरज बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत पवार यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने कलम 409, 420, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात यलगट्टे यांना पोलिसांनी पुणे येथील त्यांच्या घरून अटक केली होती.
चौकशी दरम्यान विविध विकास कामांच्या करोडो रुपयांच्या बिलाचे 2 हजार 54 पैकी 1 हजार 88 प्रमाणके गहाळ झाल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे यलगट्टे, पवार व बोर्डे यांच्या विरोधात कलम 409,420,467,468,469,477 व 34 नुसार फौजदारी कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नगर परिषदेने गहाळ प्रमाणके कोणत्या कामाची, रक्कम यासह अन्य बाबी नमूद न केल्याने पोलिसात गुन्हा नोंद झाला नाही त्यामुळे यासाठी नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची समिती गठीत केली असुन सविस्तर अहवालानंतर गुन्हासह अन्य कारवाई केली जाणार आहे.
बोगस गुंठेवारी प्रकरणाची व्याप्ती, संख्या व इतर तांत्रिक बाबी लक्षात घेता नगर रचना विभागाचे सहायक संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती गठीत केली असुन 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आठवड्यात या समितीचा अहवाल अंतीम होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी या सर्व प्रकरणात तारांकीत, लक्षवेधी सुचनाच्या माध्यमातुन आवाज उठविल्याने ही सर्व प्रकरणे बाहेर आलेली आहेत. खत निर्मिती न करता बायोमायनिंग घोटाळयाची चौकशी सुरु आहे तर घरकुल व नियमबाह्य रेखांकन आणि बांधकाम परवाने हे विषय ऐरणीवर आले आहेत