अखेर फरार आरोपी अटकेत – 8 दिवसांच्या प्रयत्नांना यश
उस्मानाबाद – समय सारथी
अनेक गुन्ह्यातील कुख्यात फरार आरोपीला पकडण्यात उस्मानाबाद पोलिसांना यश आले असुन तब्बल 8 दिवसांच्या अथक परिश्रम व प्रयत्नांनंतर आरोपीला अटक केली आहे. ताब्यातील आरोपी फरार झाल्याने आरोपी पकडल्या शिवाय परत यायचे नाही हा प्रण केलेल्या पोलीस नाईक जाधव व त्यांच्या पथकाने ही धाडसी मोहीम पार पाडत अटकेची कारवाई केली.
पंढरपूर जेलवरून ट्रान्सफर आरोपी राजु उर्फ गुडया मधुकर पवार याला उमरगा पोलीस स्टेशन येथे आणला होता. उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यात अटक करून तपासाचा अटक कालावधी संपल्यानंतर सदर आरोपी पंढरपूर जेल सोडायला जात असताना आरोपीने चालत्या गाडीतून मोहोळ येथून उडी मारून पलायन केले होते. आरोपी पळून गेल्यानंतर कर्तव्य असलेले पोलीस नाईक अतुल जाधव व त्यांचे सहकारी हे आरोपी घेतल्याशिवाय घराकडे जायचेच नाही या जिद्दीने पुणे,मोहोळ व सोलापूर जिल्ह्यात आरोपीचा शोध घेत होते. त्यांना तब्बल आठ दिवसांनी यश आले व त्यांनी आरोपी जेरबंद केला आहे.
पोलीस अधीक्षक निवा जैन व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या तपास पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कवडे, पोलीस नाईक अतुल जाधव,पोलिस कर्मचारी दिवे व गजभार यांचा सहभाग होता.