अखेर पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उस्मानाबाद दौरा
औपचारिकता ठरणार की ठोस निर्णय घेणार
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे उद्या सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत . दुपारी दीड वाजता ते जिल्हा रुग्णालयास आणि ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन पाहणी करणार आहेत. येथेच पालकमंत्री गडाख उपस्थित डॉक्टर आणि पत्रकारांशी चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी ते तामलवाडी येथील ऑक्सिजन प्लांटला भेट देणार असल्याचे कळते, कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोना संकटात गडाख हे उस्मानाबाद जिल्ह्यात न आल्याने व बैठक न घेतल्याने त्यांच्यावर मोठी टीका होत होती , गडाख हे 26 जानेवारी नंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आले नव्हते , कोरोना संकटात पालकमंत्री न आल्याने त्यांना जिल्हा भेटीचे व बैठकीचे जाहीर निमंत्रण भारतीय जनता पार्टीने दिले होते मात्र त्यांनतर दुसऱ्याच दिवशी त्यांना कोरोना झाला होता. गडाख यांचा उद्याचा उस्मानाबाद जिल्हा दौरा हा केवळ औपचारिकता ठरू नये म्हणजे झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रेमडीसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजन कमतरता , बेड उपलब्धता , कोरोना लस संपली असून पॅरासिटेमॉल व कॅल्शियम औषध वगळता औषध साठा नाही यासह डॉक्टर , स्टाफ अपुरी संख्या व अन्य समस्या कायम आहेत यावर ठोस उपाययोजना व निर्णय झाला पाहिजे अशी जिल्हावासीयची अपेक्षा आहे. अनेक रुग्णांना बेड नसल्याने स्ट्रेचर खुर्चीवर उपचार घ्यावे लागत आहेत तर कोरोना बरोबरच सारी आजाराने थैमान घातले असून कोरोना व सारीने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सारीच्या वेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. पालकमंत्री गडाख यांचा उद्याचा दौरा जिल्ह्याला वैद्यकीय सुविधा व त्यासाठी निधी मिळण्याच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.
पालकमंत्री गडाख यांच्या सोबतच राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख हे उद्या दि . 19 एप्रिल 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. देशमुख दुपारी 3:15 वाजता सोलापूर येथून ऊस्मानाबादकडे प्रयाण करतील .सायंकाळी 4:00 वाजता ऊस्मानाबाद जिल्हा कोवीड संबंधी आढावा बैठक घेतील .सायं 5:00 वा प्रस्तावित शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जागेची जिल्हा रूग्णालय परिसरात पाहणी करतील .सायं 5:30 वा पत्रकार परिषदेस समबोधित करतील .सायं 6:30 वा लातुरकडे प्रयाण करतील .
अमित देशमुख यांनी उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचे जाहीर केले मात्र त्याला अजून ठोस स्वरूप आले नाही, मागील वेळी त्यांनी अवघ्या काही महिन्यात सुरू करू अशी घोषणा केली होती.