अंमलबजावणीला सुरुवात – जिल्हाधिकारी कार्यालयावरील उस्मानाबाद नाव पुसले, आता धाराशिव झळकणार
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचा पुढाकार – 4 वाजता होणार नावाचा अनावरण सोहळा, अनेक वर्षाची स्वप्नपूर्ती
धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा, तालुका, उप विभाग व गावाचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी यांची तात्काळ अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावरील उस्मानाबाद नाव पुसले गेले असुन आता धाराशिव नाव जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकणार आहे. आज दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बोर्ड व फलकाचा अनावरण सोहळा होणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषद होणार आहे.
धाराशिवकरांची अनेक वर्षाची स्वप्नपूर्ती आज अखेर प्रत्यक्षात पुर्ण झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद व इतर कार्यालयाचे सुद्धा नाव बदलले जाणार आहे कारण उद्या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन असुन अनेक शासकीय कार्यक्रम होणार आहेत.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी दिनाच्या एक दिवस अगोदर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असुन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे.राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे अखेर जिल्हा, तालुका गाव धाराशिव झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध, उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे नाव आता धाराशिव असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सर्व शासकीय कार्यालय वरील उस्मानाबाद नावाचे सर्व बोर्ड बदलून त्यावर धाराशिव असे केले जाणार आहे यासाठी महसूल व इतर यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात धाराशिव नामकरण बाबत मुस्लिम समाजातील काही जणांनी याचिका दाखल केली. त्यावेळी राज्य सरकारने सुनावणी दरम्यान कोर्टात सांगितले की केवळ धाराशिव शहराचे नाव बाबत राजपत्र प्रसिद्धी केले आहे त्यामुळे धाराशिव जिल्हा व धाराशिव तालुका बाबत दाखल याचिका निकाली निघाली. नेमकी हीच कायदेशीर बाब साधत सरकारने जिल्हा, उप विभाग व तालुका याचे धाराशिव राजपत्र प्रसिद्ध करीत अधिसूचना काढली.
29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 14 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला परंतु 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.