अंतीम टप्यात काम – इथेनॉलपासुन ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प
उस्मानाबाद – समय सारथी
साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निमित्तीचा राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्टचे काम अंतीम टप्प्यात असून आगामी 4 दिवसात ऑक्सिजन गुणवत्ता चाचणी व तपासणी झाल्यावर ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीला सुरुवात होणार असल्याची माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव कारखान्यात या प्रकल्पासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यात आली असून याची चाचणी बाकी आहे. या प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पत्र दिले असून त्यास प्रमाणित केल्यावर मान्यता मिळताच तात्काळ मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने २३ एप्रिल रोजी झूम मिटींगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली.त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते त्या बैठकीत धाराशिव कारखान्यात हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी पाटील यांनी दाखवीत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेत ते युद्धपातळीवर सुरू केले होते ते आता पूर्णत्वास आले आहे. मशिनरी याची प्राथमिक तपासणी झाली असून सिलेंडर उच्च दाबाने भरण्याची यंत्रणा बसविणे फक्त बाकी आहे त्यापूर्वी निर्मिती होणाऱ्या ऑक्सिजनची वैद्यकीय दृष्ट्या गुणवत्ता तपासली जाणार आहे.
सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे यात कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करताना सरकार, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांची मोठी कसरत व धावपळ होत आहे मात्र उस्मानाबाद येथील साखर कारखानावरील प्रकल्प कार्यान्वित झाल्यास तो राज्यासाठी पथदर्शी व दिलासा देणारा ठरणार आहे.
अतिरिक्त सामग्रीत ‘माॅलेक्युलर सिव्ह’ वापरून हावेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. धाराशिव साखर कारखाना प्रति दिन १६ ते २० टन ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्याला लागेल इतका ऑक्सिजन निर्मिती होणार आहे, एक साखर कारखाना प्रति दिन एका जिल्ह्याला लागेल इतका ऑक्सिजन निर्माण करू शकतो. धाराशिव कारखाना प्रकल्प मान्यता मिळल्यावर इतर कारखान्यांना हा प्रकल्प सुरू करायचा असल्यास त्यांना मदत व मार्गदर्शन करण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला, इतर कारखान्यांनी होकार दिल्यास अवघ्या 10 ते 15 दिवसात प्रकल्प उभारणी करून देणे शक्य आहे असेही पाटील यांनी सांगितले. राज्यात सध्या ऑक्सिजनची गरज आहे,मोठ्या शहरात तर मागणी मोठी आहे मात्र साखर कारखाने संख्या आहे. आगामी काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर साखर कारखाने यांनी असे प्रकल्प सुरू केल्यास उस्मानाबाद हा ऑक्सिजन निर्मितीचा जिल्हा बनून प्राणवायू देणारा जिल्हा बनू शकतो असे मत पाटील यांनी व्यक्त केले.