उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असून 20 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात उस्मानाबाद शहरातील 8 तर उमरगा शहरातील 5 जणांचा समावेश आहे. उस्मानाबाद शहरातील 8 ,उमरगा तालुका 10 व परांडा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद व उमरगा शहराला हळूहळू कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.
उस्मानाबाद शहरातील झोरे गल्ली येथे तब्बल 7 रुग्ण सापडले असून ते सर्व पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत व एक रुग्ण हा काळा मारुती चौक येथील नाना दूध डेअरीजवळचा आहे. विशेष म्हणजे कालच उस्मानाबाद शहरातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असतानाच हे नवीन 8 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे शहरात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे तसेच नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.शहरातील काही भागात सील केले तरी काही महाभाग नागरिक कंटेन्मेंट क्षेत्रातून बिनदिक्कतपणे ये जा करीत स्वतःसह त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत.
उमरगा तालुक्यात 10 रुग्ण सापडले असून, त्यापैकी 5 रुग्ण हे प्रॉपर उमरगा शहरातील असून 2 डाळिंब, 2 बेडगा व 1 तलमोड येथील आहेत. परांडा तालुक्यात 2 रुग्ण असून 1 आवर पिंपरी येथील व एक धोत्री येथील आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 331 रुग्ण सापडले असून त्यापैकी 207 रुग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर 110 जणांवर उपचार सुरू आहेत, 14 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.53 टक्के समाधानकारक असून मृत्यू दर 4.22 टक्के इतका आहे अशी माहिती डॉ सतीश आदटराव यांनी दिली.