सिंचन क्षेत्रात वाढ, शिवार हिरवेगार तर रस्ते बनणार आर्थिक प्रगतीचा मार्ग
परंडा – समय सारथी
केंद्र व राज्य सरकार नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देते मात्र अनेक वेळा निधीची कमतरता असते तर काही वेळा अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळ जातो व योजना राखडतात. हीच बाब ओळखून राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सरकारच्या निधीची व प्रक्रियेची वाट न पाहता निर्णय घेत स्वखर्चातुन व भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातुन अनेक कामे केली आहेत. त्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना, शेत व शिवार रस्ते जोडण्याची मोहीम हाती घेत ती यशस्वीपणे पुर्ण करुन दाखवली आहे. या कामासाठी सावंत यांनी करोडो रुपये हे स्वखर्चाने दिले असुन यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शिवजलक्रांतीमुळे शिवार हिरवेगार होत सिंचन क्षेत्र वाढले तर शेतरस्त्यामुळे बांधापर्यंत जायला मिळाले.शिवजलक्रांती व शेतरस्ते जोड मोहीम या मंत्री डॉ सावंत यांच्या महत्वकांक्षी योजना असुन त्या राज्यासाठी आदर्शवत ठरल्या आहेत.
भुम परंडा वाशी तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना स्वखर्चाने राबविली, त्यामुळे या भागातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नदी, नाले, तलाव खोलीकरण, विस्तारीकरण व सरळीकरण आणि गाळ काढण्याची ही योजना त्यांनी 4 मे 2016 साली सुरु केली. तब्बल 60 वर्षापेक्षा अधिक काळ गाळ साचलेली सीनाकोळेगाव, खासापुरी, चांदणी, साकत यासारखी धरणे गाळमुक्त होऊन पाणीसाठा वाढला. खैरी, उल्फा, दुधना, नळी या नद्यातून गाळ उपासुन तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने जमिनीचा पोत सुधारला.
शिरसाव, वारदवाडी, माणकेश्वर, अनाळा, रोहकल, देवांग्रा, दहिफळ, आवार पिंपरी, देवगाव, शेलगाव,हिंगणगाव, डोंजा, बावची अश्या 250 पेक्षा जास्त गावात ही शिवजलक्रांती योजना राबविल्याने सिंचन क्षेत्रात कमालीची वाढ झाली. योजनेच्या माध्यमातुन 700 किलोमीटरचे काम केले त्यामुळे धरणक्षेत्रात 4 टीएमसी तर जमिनीत 12 टीएमसी पेक्षा अधिकचा भुजलसाठा जमा झाला, सिंचन क्षेत्र वाढून या भागातील दुष्काळ हटण्यास मदत झाली, शिवार हिरवेगार झाल्याने शेतकरी समाधानी आहे.
सिंचन क्षेत्र वाढले मात्र अनेक गावात व शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने अडचणी येत होत्या, मशागतीची व इतर कामे करण्यासाठी जाता येत नव्हते, वर्षानुवर्षे रस्ते बंद असल्याने शेतकऱ्यांचा विकास होत नव्हता. भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातून मंत्री सावंत यांनी मुरूम टाकण्याचे व इतर कामे केल्याने वर्षोनवर्षे वापरात नसलेले हे रस्ते आता शेतकर्यांसाठी विकासाचा मार्ग ठरत आहेत. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, केशव सावंत यांनी शिवजलक्रांती प्रमाणे या रस्ते जोडो मोहिमेत स्वत:ला वाहून घेतले.रस्ते हे जीवनवाहिनी म्हणून व प्रगतीसाठी महत्वाचे समजले जातात मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शिव व शेतरस्ते नसल्याने शेतकर्यांचे मोठे हाल होत मात्र जवळपास 500 किमी पेक्षा अधिकचे रस्ते तयार झाले आहेत. या मोहिमेमुळे बळीराजा सुखावला असून आर्थिक प्रगतीसाठी हे रस्ते महत्वपूर्ण ठरत आहेत.