धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असला तरी राजकीय वाद सुरूच आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पराभुत उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी विजयी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे यांच्यासह 30 जणांच्या विरोधात निवडीला आव्हान देणारी याचिका छत्रपती संभाजीनगर न्यायालयात दाखल केली. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे सशस्त्र पोलीस मतमोजणी केंद्रात गेल्याची तक्रार अर्चना पाटील यांनी केली होती, त्याच्या चौकशीनंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी 4 जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्याचे व संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईचे आदेश दिले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचे बंधु तथा उमेदवार प्रतिनिधी यांच्यामार्फत निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे 2 स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत.पहिली तक्रार त्यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या विरोधात केली आहे. आमदार यांना मतमोजणी दिवशी मतमोजणी प्रतिनिधी होता येत नाही अथवा मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येत नाही. असे असतानाही या दोघांनी अनधिकृतपणे अंगरक्षकासह प्रवेश करुन मतमोजणी करणारे कर्मचारी यांच्यावर दबाव निर्माण केला व आचारसंहितेचा भंग केला.
ओमराजे यांनी दुसरी एक तक्रार भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार राजेंद्र राऊत, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह उमेदवार अर्चना पाटील, त्यांचे दोन्ही पुत्र मल्हार व मेघ यांच्या विरोधात दिली आहे. मतदान दिवशी 7 मे रोजी ही सर्व मंडळी विनापरवाना व अनधिकृतपणे मतदान केंद्राच्या बुथमध्ये प्रवेश करुन अर्चना पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करीत होते.त्यामुळे मतदार, बुथ कर्मचारी यांच्यावर दबाव निर्माण झाला. त्यांनी आचारसंहिता भंग केला असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दोन्ही तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.