धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर व उमरगा या 4 विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक होत असुन यावर्षी 2024 मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होताना दिसत आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर घटक पक्ष आहेत तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा व इतर पक्ष आहेत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे लढले त्यावेळी धाराशिव मतदार संघातील 4 पैकी 3 ही जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या तर एक जागा भाजपला मिळाली.
धाराशिव जिल्ह्यात 2004 च्या पूर्वी 5 विधानसभा मतदार संघ होते. मात्र, त्यानंतर मतदार संघ पुनर्रचनेत कळंब मतदार संघ कमी होऊन उस्मानाबाद,तुळजापूर,परांडा व उमरगा हे 4 मतदार संघ झाले. धाराशिव मतदार संघातून शिवसेना कैलास घाडगे पाटील, तुळजापूर मतदार संघ भाजपकडुन राणाजगजीतसिंह पाटील, परंडा येथून प्रा डॉ तानाजीराव सावंत व उमरगा येथून ज्ञानराज चौगुले हे निवडून आले. सत्ता परिवर्तन वेळी शिवसेना पक्ष फुटला त्यात आमदार चौगुले व डॉ सावंत हे शिंदे गटात गेले तर कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले.
उस्मानाबाद विधानसभा मतदार हा डॉ पद्मसिंह पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात होता, जिल्ह्यात ते सर्वाधिक 7 वेळेस आमदार म्हणून निवडून आले . 2009 ची निवडणूक ओमराजे निंबाळकर वगळता त्यांच्या सत्ता साम्राज्याला एकाही नेत्याने किंवा पक्षाने सुरुंग लावलेला नाही. डॉ पद्मसिंह पाटील यांनी मीच ‘किंग’ आहे हे नेहमी या मतदार संघातून दाखवून दिले आहे .1978 साली डॉ पद्मसिंह पाटील पहिल्यांदा काँग्रेस अर्स पक्षाकडून आमदार झाले आणि त्यानंतर त्यांची विजयी घोडदौड 2009 च्या निवडणुकीपर्यंत सुरूच राहिली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला मात्र राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्याचा वचपा 2014 च्या निवडणुकीत काढला व ओमराजे यांचा 10 हजार 806 मतांनी पराभव केला त्यानंतर राणाजगजीत पाटील यांनी 2019 ला राष्ट्रवादी पक्ष बदलून भाजपात प्रवेश करुन तुळजापूर विधानसभा मतदार संघात विजय मिळविली. धाराशिव विधानसभा मतदार संघात कैलास पाटील यांनी 2019 साली विजय मिळवून त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.
तुळजापूर मतदार हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1978 व 1985 ची निवडणूक शेकापच्या माणिकराव खपले यांनी जिंकली. मात्र, उर्वरित काळात येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण 1990 साली पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आमदार झाले. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंतच्या 20 वर्षाच्या काळात ते कायम आमदार राहिले. 2019 च्या निवडणुकीच्या आखाड्यात ते पराभूत झाले. मधुकरराव चव्हाण हे 25 वर्ष आमदार राहिले व ते काँग्रेस सरकारच्या काळात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रीही राहिले. तुळजापूर मतदार संघ जणू आमदार चव्हाण यांचे संस्थान बनले होते मात्र भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
परंडा मतदार संघात वासुदेवराव देशमुख हे आरपीआय व जनता पक्षाच्या तर ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेनेच्या माध्यमातून 10 वर्ष आमदार झाले. तर महारुद बप्पा मोटे 2 वेळेस व त्यांचे पुत्र राहुल मोटे हे विजयाची हॅट्रिक करीत सलग 3 वेळेस आमदार राहिले. मोटे परिवाराकडे या मतदार संघात तब्बल 25 वर्ष सत्ता राहिली त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदार संघ बालेकिल्ला बनला होता मात्र सलग 3 वेळेस विजयाची हॅट्रिक करणाऱ्या मोटे यांचा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पराभव केला. त्यांनी 32 हजार 902 विक्रमी मतांनी विजय मिळविला.
उमरगा मतदार संघात सुरुवातीची 20 वर्ष चालुक्य परिवाराची सत्ता होती. भास्करराव चालुक्य काँग्रेस आयकडून सलग 3 वेळेस तर विजयसिंह चालुक्य एक वेळेस शेकापकडून आमदार राहिले. 1995 ला काँग्रेसचा हा बालेकिल्ला शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी काबीज केला. 1999 ला काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी विजय मिळविल्यानंतर 2004 ला पुन्हा रवींद्र गायकवाड आमदार झाले व त्यानंतर खासदार. 2009 पासून सलग 3 टर्म शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले आमदार आहेत. गायकवाड व चौगुले या गुरु शिष्याच्या जोडीने या मतदार संघात 25 वर्ष सत्ता उपभोगली आहे त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेचा हक्काचा बनला.