हक्काच्या पाण्यासाठी डॉ पद्मसिंह पाटील यांनी संघर्ष करत राजकिय किंमत मोजली, अडथळ्यावर मात केली
2024 पर्यंत पाणी आणणार, इतर पाण्यासाठी संघर्ष करणार – भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील
तुळजापूर – समय सारथी
हक्काच्या पाण्यासाठी डॉ पद्मसिंह पाटील यांनी संघर्ष करत राजकिय किंमत मोजली, गेली 2 दशके अनेक अडथळ्यावर मात केली. 2024 पर्यंत कृष्णा मराठवाडा प्रकल्पचे पाणी आणणार असल्याचे सांगत अतिरिक्त हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला 11 हजार 700 कोटीची मंजुरी देण्यात आली असून 2024 पर्यंत सात टीएमसी पाणी जिल्ह्यात येणार असे आमदार पाटील म्हणाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा व ऐतिहासिक असून गेल्या दोन दशकापासून रखडत पडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला 11 हजार 700 कोटीची प्रशासकीय मंजुरी देऊन शिंदे फडवणीस सरकारने उस्मानाबादकरांचे स्वप्न पूर्ण करण्यास गती दिली असून 2024 पर्यंत किमान सात टीएमसी पाणी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येणार असल्याची माहिती तुळजापूरचे भाजप आमदार तथा माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयाचे भाजप आमदार राणाजगजिसिंह पद्मसिंह पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारचे स्वागत करत आभार मानले व कार्यकर्त्यांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून किमान 30 टीएमसी पेक्षा जास्त अधिकार उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे मात्र 2003 साली कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उस्मानाबाद बीड जिल्ह्यासाठी 21 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले हा प्रकल्प राबवण्यासाठी तत्कालीन सरकारने तुटपुंजी आर्थिक तरतूद करत वेळ घालवीला, सततचा पाठपुरावा यासाठी कामी आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांसह मंत्रिमंडळाचे आभार मानले.
पहिल्या टप्प्यातील सात टीएमसी पाणी तात्काळ उपलब्ध होण्यास गती मिळणार आहे 2024 पर्यंत हे सात टीएमसी पाणी जिल्ह्यामध्ये आणून उर्वरित इतर हक्काच्या पाण्यासाठी पाठपुरावा करण्याची माहिती आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी दिली.
सिंचन वाढणार, पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मिटणार –
योजनेचा मोठा भाग अवर्षण प्रवन भागात येत असल्यामुळे लाभ क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा उपलब्ध होण्यास मदत आहे. परंडा, भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा व उमरगा या ८ तालुक्यांसाठी उपसा सिंचन योजना क्र. १ व २ द्वारे एकूण १२ टप्प्याद्वारे पाणी उपसा करण्यात येणार असून त्याद्वारे ८९ गावांमधील २५७९८ हेक्टर तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ४४ गावांमधील ८१४७ हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजना क्र.३ द्वारे सिंचनाखाली येणार असून एकूण दोन्ही जिल्ह्यामधील ३३ हजार ९४५ हेक्टर सिंचनाखाली येणार आहे