धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तेरणा शेतकरी साखर कारखान्याच्या उसाचा भाव जाहीर करण्यात आला असुन भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी ढोकी येथील मोळीपुजन कार्यक्रमात जाहीर केला.
तेरणेच्या उसाला 2825 रुपयांची पहिली उचल दिली जाईल त्यानंतर जिल्ह्यातील सर्वाधिक अंतीम भाव जाहीर करणाऱ्या कारखान्यापेक्षा 21 रुपयाने जास्त भाव देणार असल्याचे मंत्री सावंत यांनी जाहीर केले. ज्याला स्पर्धा करायची इच्छा आहे त्याने अंतीम भाव जाहीर करीत तो द्यावा त्यापेक्षा तेरणाचा भाव हा 21 रुपये जास्त देण्यात येणार आहे.
तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आली त्यावेळी सुरुवातीला ती कोणी भरली नाही, मात्र सावंत यांनी लक्ष घातल्यावर जिल्ह्यातील काही नतदृष्ट नेत्यांनी लातूरचे उंबरठे झीझवून निविदा भरायला लावली असे सांगत त्यांनी नाव न घेता टीका केली. ज्यांची इच्छा नव्हती त्यांना टेंडर भरायला इथे आलेच पहिले अशी गळ घातली. ज्यांनी कारखान्याचा कोळसा केला त्यांचे उपद्याप जनता अजून विसरलेली नाही आणि विसरणार नाही.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी समेट नागपूरच्या अधिवेशनात घडवून आणला, वादावर पडदा टाकत आमच्या ताब्यात तेरणा दिला.
साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी तेरणा कारखान्याच्या मोळीपुजन सोहळा संपन्न झाला यावेळी चेअरमन शिवाजीराव सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, प्रकाश बोधले महाराज, कार्यकारी संचालक केशव सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, मोहन पनुरे, सुरज साळुंके, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे,अजित लाकाळ, बाळासाहेब शिंदे, संजय गाढवे यांच्यासह पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी,कामगार,कर्मचारी उपस्थितीत होते.
तेरणा सुरु होणार म्हणलं की घाम फुटला,काही कारखाने सुरु झाले, नुसतं मोळी टाकायचा कार्यक्रम आला की गुळ व इतर साखर कारखाने यांनी भाव जाहीर केले. 150 ते 175 कोटी खर्च करुन आपण तेरणा सुरु केला. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत असुन सगळ्यांनी 2 हजार 800 भाव जाहीर केला त्यामुळे त्यापेक्षा 25 रुपये जास्त म्हणजे 2 हजार 825 पहिली उचल जाहीर करीत असुन हा अंतीम भाव नाही.
एकच सांगतो ही स्पर्धेची जागा नाही मात्र जर कोणाची इच्छा असेल तर मी ही मैदानात आहे. जो कोणी अंतीम भाव देईल त्यापेक्षा 21 रुपये जास्त अंतीम भाव देईल असे सांगत मंत्री सावंत यांनी आव्हान दिले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.यामुळेच ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रोजगार,व्यवसाय आणि उद्योगधंदयाना चालना मिळते.भैरवनाथ उद्योग समूहाने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यामुळेच चालविण्यासाठी घेतला असल्याचे म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही हा कारखाना आमच्याकडे सुपूर्द करताना आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. तेरणा कारखान्याच्या नव्याने सुरू होत असलेल्या हंगामामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.स्थानिकांना देखील रोजगार मिळेल.गावाच्या व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल. त्यामुळे हा कारखाना कायम सुरू ठेवण्याची जबाबदारी येथील शेतकरी बांधवांची आहे.